Friday, 8 April 2011

वीरांचा कैसा असे वसंत


कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांच्या 'वीरों का हो कैसा वसन्त' या कवितेचा मी भावानुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे .

येतसे हिमालयातून आव्हान |
 उफाळून येई सागरा उधाण |
क्षितिज असो की नभ अनंत|
पुसति सारे दिग दिगंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

सजली वने लेऊन अनेक रंग |
फुलातुनी दरवळे नव सुगंध|
वसुधेचे पुलकित हर एक अंग|
पण देशमन दिसे सचिंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

भरे कोकीळ तो मधुर तान |
भ्रमर गुंजरावात करिती गान|
निवडा विलास की रण अनंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

हाती मधुघट की क्रुपाण|
यौवनांगा की धनुष्य बाण |
हीच समस्या होत दुरंत  |
वीरांचा कैसा असे वसंत|

आता इतिहासा मौन त्याग|
लंके का तुजला लागे आग|
हे कुरुक्षेत्रा आता जाग जाग|
सांग तुझे अनुभव अनंत|


हळदीघाटाच्या शिळांनो या |
सह्याद्रीच्या दुर्गानो या |
शिव-प्रताप गाथानो या|
जागवा आज त्या स्मृति ज्वलंत|
वीरांचा कैसा असे वसंत|
-
परिमल विश्वास गजेंद्रगडकर 
१०/०१/२०११ 
१०/१/२०११

Saturday, 2 April 2011

काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला

द्रौपदी स्वयंवराकरिता अति अवघड पण रचलेला।वेधेल अचुक लक्ष्याला वरणार याज्ञसेनी त्याला |
सुकुमारी ती सजलेली जणू रती मदनाची अवतरलेली।जशी कुमुदिनी फुले पाण्यात खळी गालावर फुललेली।


भारतवर्षीचे राजे होते त्या सभेत जमलेले।बनविण्या तिज अर्धाँगी काही जण आसुसलेले।
परी बिकट तो मत्स्यवेध ना कुणास जमला | लाविता प्रत्यंचा धनुला दम कित्येकांचा फुलला।


वांझ ठरे का वीर प्रसवा भारतभूमी | की या धरेवर दुष्काळ वीरांचा पडला |
पाहुन दृश्य समोरी द्रुपद ही चिंतीत बनला। जिंकील जो पणात असा का नरसिंह भारती नुरला।


तितक्यात उठे पदरव सामोरा ये नरपुंगव। दानवीर म्हणती ज्याला तो कवचधारी सुर्यकुलोद्भव
सुवर्णासम ज्याची कांती वज्रासम ज्याचे बाहु।कुंडले शोभती  ज्याला तो सव्यसाची अजानुबाहु।


उचलुनी धनुष्य हाती अंगराज शरसंधाना सिध्द होई।तितक्यात कटु स्वर एक कानी कर्णाच्या येई।
भर सभेत गर्जे द्रुपदकन्या वरणार न मी सुतपुत्राला। मृत्तिकेत न शोभे मोती हंसिनी न मिळे कावळ्याला।


सूतपुत्र कि राजकुमार जन्म तर दैवाने मिळतो |कुणा नशिबी फुलांच्या पायघड्या अन कुणा वनवास  मिळतो |

परिस्थितीच्या ऐरणीवर अडचणींचे जो घाव झेलतो  |संकटाच्या मुशीतूनच तर तो खरा  नरवीर जन्मा येतो | 

पुरुषार्थ म्हणती कशाला ना ठावे खुळ्या द्रौपदीला।सुतपुत्र म्हणत जिने अव्हेरले सुर्यपुत्राला |
दुराभिमानापोटी जिने लाथाडिले सौभाग्याला। काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला।


©परिमल विश्वास गजेंद्रगडकर 
०२/०४/२०११ |