Saturday 18 June 2011

पक्षी पिंजर्यातून उडाला

शहाने हुशारीने रचला होता डाव,  दख्खनी राजाला दावायचा शाही बडेजाव।
तख्तापुढे लवति जिथे खान राणे अन् राव, तिथे कुठे लागावा स्वराज्याचा पडाव।

ज्या नरसिँहाने अफजलखान फाडला ,शास्ताखान बोट छाटुन माघारी धाडला।
 ज्याच्या फौजेने सुरतेत केला कहर, तो शिवा हात जोडत दरबारी होणार हजर।

दरबारी दाखल झाली शिवरायांची स्वारी।शहाने राजांना ठरविले जहागीरदार पंचहजारी।
 ज्यांनी रणात मावळ्यांना दाविली पाठ। शिवरायांपुढे मिरवीती माना करुनी ताठ।

पण आलमगीरास पडला एका गोष्टीचा  विसर । सिंह  कैद झाला तरी कैद होत नाही त्याची जिगर।
आणि त्या दिवशी दरबारात एक नवल घडल । मराठी वाघाच्या डरकाळीने दिल्लीच तख्त हादरल|

नकोत त्या अपमानाच्या खिलती अन् नाहि  पांघरणार लाचारीच्या झुली ।
अपमान पचवत न घालणार मान खाली। ऐकता खडे बोल ती सभा थरारली।

महाराजांभोवती पडला शाही  फौजेचा गराडा, फुलादखानान ठेवला पहारा खडा।
तोडायचा कसा आता हा वेढा।महाराजांच्या जीवलगांपुढे उभा राहिला सवाल बडा|

औरंगशाहाचे डोके जेव्हा  लागले घातपाताचे  डाव लागले रचायला |
राजपुती वचनासाठी  कुंवर रामसिंग उभा राहिला राजांचे प्राण रक्षयाला|

शेवटी सह्याद्रीच्या रानच्या   वाघाला आग्र्याच्या महालांची  हवा नाही मानवली |
महाराष्ट्रसुर्याला नजर कुणाची लागली,दिवसेंदिवस  महाराजांची तब्येत बिघडू  लागली|

वैद्य  आणि हकीमांकडे औषधासाठी मावळ्यांच्या चकरा झाल्या सुरु |
दुवा मिळण्या गरिबांच्या वाटले जाऊ लागले पेठा, पेढे बर्फी अन  लाडू|

एक दिवस वेढ्यातून न तपासताच बाहेर पडला एक मिठाईचा पेटारा |
तपासणार कोण  कशाला ,पहारेकर्यांसाठी झालता नित्याचा मामला सारा|

जेव्हा औषध आणायला  गेलेला कुणीही माघारी नाही आला |
तेव्हा फुलादखानाच्या मनी संशयाचा किडा  जागा झाला |

शोधून पाहिलं आत तर मराठी शेर गायब झालेला |
हजारोंच्या  फौजेचा पिंजरा तोडून पक्षी उडालेला |
धूळ चारत आले होते  आजवर वीर दुष्मनाला |
आज मराठी राजाने होता मिठाईतून डाव साधलेला |



©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१८  / ०६  /२०११