Sunday, 7 October 2012

लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे

'व्यक्तीने परिवारासाठी, परिवाराने गावासाठी आणि गावाने देशासाठी त्यागाची तयारी ठेवावी '- आचार्य चाणक्य .

अर्थशास्त्रात देशहितासाठी त्याग हे सूत्र चाणक्य वरील शब्दांमध्ये सूत्रबद्ध करतात. त्यांच्या या सूत्राचा प्रत्यय देणारे तीन ठळक प्रसंग भारताच्या इतिहासात येतात.

२१ जून १५७६:वेळ माध्यान्हिची तरी सुर्यनारायणच्या उष्म्यापेक्षा मोगल तोफांचा मारा राजपुतांना जास्त ताप देत होता. हळदी घाटाच्या मध्ये मोगल आणि मेवाड यांच्या झुंजीत मोगलांचे पारडे जड होऊ लागले होते. आधीच एकास पाच अशी विषम लढत आणि त्यात मुघलांच्या तोफा राजपुतांना जाळत होत्या. या सगळ्या अडचणींची महाराणा प्रतापाला जाणीव नव्हती? होती पूर्ण जाणीव होती. आपल्याकडे तोफा नाहीत आणि उघड मैदानात मुघलांचे संख्याबळ आपल्यावर भारी पडणार याची महाराणांना पुरेपूर जाणीव होती म्हणून तर त्यांनी मुघल सेनापती मानसिगाला हळदी घाटीच्या खिंडीपर्यंत झुलवून आणला होता. पण तरीही हा सामना अवघडच होता. राणा प्रतापांकडे निर्णायक विजय मिळवण्यासाठी एकच पर्याय शिल्लक होता -मुघल सेनापतीचा मृत्यू.  
              सेनापती पडला कि सैन्य हि पळते हा प्रकार त्यावेळी काही नवीन नव्हता . महाराणांनी  युद्धाचा रंग ओळखला त्याच बरोबर मुघलांच्या सैन्यातला कमकुवत दुवा हि ओळखला . मानसिंग हत्तीवरून लढत होता कारण हत्ती म्हणजे जणू चालता फिरता बुरुजच .हे बघतच महाराणांनी एक धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या अंगरक्षक दलासह महाराणा स्वतः मानसिंगावर चालून गेले. महाराणांच्या रक्षकांनी त्यांना मानसिंगावर धावून जाण्यासाठी शक्य तितका मार्ग मोकळा केला तोही  अर्थात कापाकापी करूनच. स्वतः महाराणा वाटेत आडवा येणाऱ्याला कायमचा आडवा करून मानसिंगाच्या हत्तीपर्यंत पोहचले . महाराणांच्या एकाच इशार्यावर त्यांच्या लाडक्या चेतकने आपले पुढचे पाय उचलून हत्तीच्या सोंडेवर रोवले . तितक्यातच महाराणांनी हातात भाला पेलला आणि क्षणार्धात मानसिंगावर फेकला. पण येथे राणाजींचे दुर्दैव माहुताच्या रुपात आडवे आले आणि मानसिंग बचावला. राणाजींचा धाडसी बेत  त्यांच्यावरच उलटला.राणाजी मुघलांच्या गराड्यात सापडले.राणाजींना मुघलांनी   पाहताच त्यांच्या झाला सरदारांपैकी मन्नासिंह त्यांना वाचवण्यासाठी सरसावले. राणाजींभोवती पडलेले मुघलांचे कडे  तोडत मन्नासिंह त्यांच्यापर्यंत पोहचले. राणाजींजवळ जात त्यांनी राणाजींच्या डोक्यावरील मेवाडचा मुकुट काढला व राणाजींना इतर रक्षकांबरोबर बाहेर पडण्यास सांगितले. क्षणभर राणाजी चिडले, मेवाडच्या त्या पुरुषसिंहाला माघार घेणे मान्य नव्हते.पण मन्नासिंहाने राणाजींना समजावले कि आत्ता माघार घेतली नाही तर त्यांच्या रूपाने मेवाडचा सम्मान मुघलांच्या हाती सापडेल.राणाजींना माघार घेण्यासाठी रस्ता  बनवतच मन्नासिंहाने मेवाडचा मुकुट शिरावर धारण केला.  युद्धाच्या  गदारोळात मोगल राणाजींच्या मुकुटामुळे मन्नासिंहावर चालून आले. राणाजीं सुखरूप माघार घेता यावी म्हणून मन्नासिंहही मुघलांवर  त्वेषाने तुटून पडले.मार्तंडभैरव बनत माथ्यावरील मुकुटालासाजेसा साजेसा पराक्रम गाजवत मन्नासिंह धारातीर्थी पडले ते मेवाडसाठी, महाराणांसाठी, मायभूसाठी.

१२ जुलै  १६६०: शिवाजी महाराज शरण येणार ही बातमी कळल्याने सिद्दी जौहरची छावणी सुस्तावली पण त्याचे नजरबाज नाही. अशाच काही नजरबाजांच्या नजरेत काही मावळे वेढ्यातून बाहेर पडताना दिसले. हि खबर जौहरला सांगण्यासाठी त्यांनी लगेच छावणीच्या दिशेने धाव घेतली. गडबडीत एक गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटली कि मावळे एक नव्हे  तर दोन पालख्या सोबत घेवून धावत होते . आपल्याला सिद्दीच्या हेरांनी पाहिले हि गोष्ट मावळ्यांनी ताडली . त्यासाठी तर पन्हाळ्यावरून निघताना दोन पालख्या आणि दोन महाराजांसोबत मावळे निघाले होते. छत्रपतींना जौहरच्या वेढ्याच्या बाबतीतल्या जागरूकतेची पूर्ण माहिती होती आणि वाटेवर कुठे न कुठे जौहरचे हेर आपल्याला पाहतील याचीही त्यांना पूर्ण कल्पना होती . त्यासाठीच दुसऱ्या पालखीची योजना होती , होणारा पाठलाग टाळून सिद्दीची दिशाभूल करण्याची कामगिरी शिवा काशिदांनी उचलली ती महाराजांना विशाळगडाकडे जायला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून . पुढे काय झाले त्याची गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाली आहे. महाराष्ट्राच्या ,सह्याद्रीच्या, जिजाऊ मासाहेबांच्या , स्वराज्याच्या लाडक्या शिवबांकरिता शिवा काशीद , बाजीप्रभू आणि तीनशे मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

२२ डिसेंबर १७०४:चमकौर साहिब ची गढी सुभेदार वजीर खानच्या फौजांनी वेढली होती. सुभेदार वजीर खान खूप आनंदात होता कारण अनेक वर्षांनतर मुघल सेनेला मोठ यश मिळणार होत. कारण चामकौरच्या गढीत अडकले होते दस्तुरखुद्द दशम गुरु श्री गुरु गोविंदसिंगजी. तिकडे महाराष्ट्रात पातशहा औरंगजेबाला मराठ्यांनी त्रस्त करून सोडले होते तर पंजाबात गुरु गोविंदसिंगांच्या नेतृत्वात शिखांनी नवीन आघाडी जोरात उघडून मुघलांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी करून सोडली होती.अशात गुरु गोविंदसिंग हाती लागणे म्हणजे एका ठिकाणी तरी स्वस्थता लाभणार होती. तिकडे गढीच्या आत गुरूंची आपल्या सहकाऱ्यांबरोबर खलबते चालू होती. रात्रीच्या वेळी गुरूंना वेढ्यातून बाहेर तर काढता आले असते पण त्यानंतर त्यांचा पाठलाग झाला असता. अशावेळी भाई जीवनसिंग पुढे आले . भाई जीवनसिंग म्हणजे श्रद्धा, त्याग आणि पराक्रमाचे मूर्तिमंत प्रतिक.भाई जीवनसिंगांची चेहरेपट्टी आणि शरीरयष्टी गुरूंशी मिळतीजुळती होती. त्यांनी गुरूंना रात्री अंधाराचा फायदा घेत निघून जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी जीवनसिंगांनी गुरूंचा पोशाख आणि शस्त्रे धारण केली . दोन्ही हातात तलवारी घेऊन भाई जीवनसिंग आपल्यासोबत्यांनिशी सव्वा लाखाच्या मुघलसेनेवर तुटून पडले.मुघलांचा प्रयत्न त्यांना जिवंत पकडून औरंगजेबापुढे हजर करण्याचा होता. पण जीवनसिंगांच्या तलवारीचा तिखटपणा मुघलांना साहवेना. शेवटी दुरूनच गोळ्या आणि बाणांचा वर्षाव केला तेव्हाच रणांगणावरील जीवनसिंग नावाचे वादळ शांत झाले. गुरूंचा पोशाख आणि शिरपेचामुळे गुरु गोविन्दसिंगच पडले असा वजीर खानाचा समज झाला.त्याने जीवनसिंगांचे शीर धडावेगळे करून पातशहाकडे पाठवले . त्यानंतर झालेला घोटाळा औरंगजेबाच्या लक्षात आला. पण तोपर्यंत गुरूंना सुरक्षित ठिकाणी निघून जायला पुरेसा वेळ मिळाला होता. गुरूंचे प्राण वाचवण्यासाठी जीवनसिंगांनी प्राणार्पण केले. गुरुंपर्यंत हि बातमी पोहचली तेव्हा गुरूंनी जीवनसिंगांसाठी 'सवा लाखसे एक लडाउ' हे गौरवोद्गार काढले.

सुमारे सव्वाशे वर्षांच्या कालखंडात घडलेल्या या तीन घटना. जाज्वल्य देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांची अजरामर गाथा सांगणाऱ्या. तिन्ही ठिकाणी एकच सूत्र देशासाठी लाख मेले तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे

Sunday, 5 February 2012

पंढरीचे सुख वर्णावे किती

लावोनिया चंदन उटी मणी कौस्तुभ शोभे कंठी|
भक्ताचिया साठी युगे अठ्ठावीस उभा जगजेठी |

 शोभे तुळशी माळ ज्याचे गळा|
राजस सुकुमाराचा मज लागो लळा|
वाळवंटी जमे वैष्णवांचा मेळा|
पाहावा सुख सोहळा डोळे भरोनिया |
पंढरीत होती साऱ्या संतांचिया भेटी |
वैकुंठ अवतरे भूवरी चंद्रभागे काठी |

 
अवघे संत गाती ज्या पंढरीचे महती |
फिकी तिच्यापुढे इंद्राची अमरावती |

 
©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
माघ शुक्ल एकादशी शके १९३३
(२ फेब्रुवारी २०१२)

Sunday, 8 January 2012

जेव्हा तो लढला होता

जवळपास सहा महिन्यांपूर्वी टेनिसन ची The Charge of the Light Brigade हि कवीता माझ्या वाचण्यात आली. हि सहाशे इंग्रज सैनिकांवर केलेली कविता , ज्यात जीवाची पर्वा न करता चालून जाणार्या सैनिकांचं वर्णन केल होत. हि कविता वाचल्यापासून माझ्या डोळ्यांपुढे सतत मुरारबाजी सोबत दिलेरखानाशी लढलेले सातशे मराठे येत. पुरंदरला दिलेरखानच्या तावडीतून सोडवायचा निकराचा प्रयत्न करताना मुरारबाजीने पराक्रमाची शर्थ केली. क्षणभर दिलेर खानालाही  वाटून गेल कि असा मर्द आपल्या फौजेत हवा . त्यान मुरार्बाजीना कौल दिला , जहागीरीच आमिष दाखवलं. मुरारबाजीने ते नाकारलं आणि स्वराज्याशी इमान राखल. हा प्रसंग मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

दख्खन वरती चालून आली मिर्झा राजांची स्वारी | सोबतील दिलेरखान अन फौजफाटा होता भारी|
जिंकायचं स्वराज्य, वाढवायचा रुबाब दरबारी| ठाऊक न बिचार्यास कि महाराजांची माणस आहेत न्यारी |

दिलेरखानास बिलकुल निघत नव्हता दम थोडा| सासवडला येताच त्यान दिला पुरंदरास वेढा|
रुद्रमाळ नि पुरंदरावर चालू झाला मारा जोरदार | पण पुरंदरचा किल्लेदार हि होता तेवढाच तालेवार |

हळूहळू खानाने पुरंदरचा वेढा आवळला |तोफांच्या माऱ्यापुढे एक दिवस वज्रगड हि पडला|
जणू कुणी पुरंदरचा खड्गहस्तच तोडला |तोफांचा मारा आता पुरंदरच्या माचीला जाऊन भिडला|

त्यातच एक दिवस सफेद बुरुजावर सुरुंग उडाला | सहज किल्ला जिंकण्याच्या स्वप्नात खान बुडाला|
पण तोफांच्या मार्यानेही मागे हटेनात महाराजांची मानसे|डरली न तोफांना दोन असो कि दोनशे|

तेव्हा दिलेरखानाने ठरवलं रचायचा सुलतानढवा | आता एकाच फटक्यात पुरंदरचा घास घ्यायला हवा|
गोळा केले त्याने पाच हजार कडवे बहलीये पठाण |ज्यांच्या तलवारीला सदैव दुष्मनाच्या रक्ताची तहान |

पाहत होता गडावरून हि तयारी मुरारबाजी|समशेरीचा शेर अन मैदानात रणगाजी|
त्यान ठरवलं आता पलटूया हि बाजी |उधळायचा डाव खानाचा असा निश्चय मनामाजी |

सातशे मराठी मर्दानी उचलली मग ढाल तलवार |भाळी लावला भंडारा बोलत जय मल्हार |
खानाला दाखवण्या निघाले मराठी जोहार |हरहर महादेव गर्जत रणी तळपू लागल मराठी हत्यार|

मुरारबाजीच्या अंगी जणू प्रलयभैरव संचारला|शिवासाठी पुन्हा एकदा वीरभद्र रक्ताने न्हाला|
पाहून पराक्रम त्याचा खानही क्षणभर दिपला|असावा असा रुस्तुम संगती हा मोह त्याला पडला |

ये चाकरीत शहाच्या करू आम्ही तुझी सर्फराजी|घे कौल तू शहाचा ऐक एवढी गोष्ट माझी|
कौल तुझा लखलाभ तुला स्वराज्य हि दौलत माझी | समशेरीने उत्तर देण्या झेपावे मुरारबाजी |

आता मुरारबाजीला लागला एकच ध्यास| घेवून खानच्या नरडीचा घास तोडायचा पुरंदरचा फास|
तितक्यात खानच्या बाणान साधला होता डाव |कंठनाळ छेदत मुरारबाजीच्या वर्मी पडला होता घाव|

शिर कटूनहि मुरारबाजीचा देह रणांगणी झुंजला |
स्वराज्यासाठी महाराजांचा रुस्तुम रक्तात रंगला|
कशी पैदा होतात अशी माणसे सवाल खानास पडला|
कालभैरव बनून जेव्हा मुरारबाजी पुरंदरी लढला |

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर

२६ / १२/२०११