Sunday, 8 January 2012

जेव्हा तो लढला होता

जवळपास सहा महिन्यांपूर्वी टेनिसन ची The Charge of the Light Brigade हि कवीता माझ्या वाचण्यात आली. हि सहाशे इंग्रज सैनिकांवर केलेली कविता , ज्यात जीवाची पर्वा न करता चालून जाणार्या सैनिकांचं वर्णन केल होत. हि कविता वाचल्यापासून माझ्या डोळ्यांपुढे सतत मुरारबाजी सोबत दिलेरखानाशी लढलेले सातशे मराठे येत. पुरंदरला दिलेरखानच्या तावडीतून सोडवायचा निकराचा प्रयत्न करताना मुरारबाजीने पराक्रमाची शर्थ केली. क्षणभर दिलेर खानालाही  वाटून गेल कि असा मर्द आपल्या फौजेत हवा . त्यान मुरार्बाजीना कौल दिला , जहागीरीच आमिष दाखवलं. मुरारबाजीने ते नाकारलं आणि स्वराज्याशी इमान राखल. हा प्रसंग मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

दख्खन वरती चालून आली मिर्झा राजांची स्वारी | सोबतील दिलेरखान अन फौजफाटा होता भारी|
जिंकायचं स्वराज्य, वाढवायचा रुबाब दरबारी| ठाऊक न बिचार्यास कि महाराजांची माणस आहेत न्यारी |

दिलेरखानास बिलकुल निघत नव्हता दम थोडा| सासवडला येताच त्यान दिला पुरंदरास वेढा|
रुद्रमाळ नि पुरंदरावर चालू झाला मारा जोरदार | पण पुरंदरचा किल्लेदार हि होता तेवढाच तालेवार |

हळूहळू खानाने पुरंदरचा वेढा आवळला |तोफांच्या माऱ्यापुढे एक दिवस वज्रगड हि पडला|
जणू कुणी पुरंदरचा खड्गहस्तच तोडला |तोफांचा मारा आता पुरंदरच्या माचीला जाऊन भिडला|

त्यातच एक दिवस सफेद बुरुजावर सुरुंग उडाला | सहज किल्ला जिंकण्याच्या स्वप्नात खान बुडाला|
पण तोफांच्या मार्यानेही मागे हटेनात महाराजांची मानसे|डरली न तोफांना दोन असो कि दोनशे|

तेव्हा दिलेरखानाने ठरवलं रचायचा सुलतानढवा | आता एकाच फटक्यात पुरंदरचा घास घ्यायला हवा|
गोळा केले त्याने पाच हजार कडवे बहलीये पठाण |ज्यांच्या तलवारीला सदैव दुष्मनाच्या रक्ताची तहान |

पाहत होता गडावरून हि तयारी मुरारबाजी|समशेरीचा शेर अन मैदानात रणगाजी|
त्यान ठरवलं आता पलटूया हि बाजी |उधळायचा डाव खानाचा असा निश्चय मनामाजी |

सातशे मराठी मर्दानी उचलली मग ढाल तलवार |भाळी लावला भंडारा बोलत जय मल्हार |
खानाला दाखवण्या निघाले मराठी जोहार |हरहर महादेव गर्जत रणी तळपू लागल मराठी हत्यार|

मुरारबाजीच्या अंगी जणू प्रलयभैरव संचारला|शिवासाठी पुन्हा एकदा वीरभद्र रक्ताने न्हाला|
पाहून पराक्रम त्याचा खानही क्षणभर दिपला|असावा असा रुस्तुम संगती हा मोह त्याला पडला |

ये चाकरीत शहाच्या करू आम्ही तुझी सर्फराजी|घे कौल तू शहाचा ऐक एवढी गोष्ट माझी|
कौल तुझा लखलाभ तुला स्वराज्य हि दौलत माझी | समशेरीने उत्तर देण्या झेपावे मुरारबाजी |

आता मुरारबाजीला लागला एकच ध्यास| घेवून खानच्या नरडीचा घास तोडायचा पुरंदरचा फास|
तितक्यात खानच्या बाणान साधला होता डाव |कंठनाळ छेदत मुरारबाजीच्या वर्मी पडला होता घाव|

शिर कटूनहि मुरारबाजीचा देह रणांगणी झुंजला |
स्वराज्यासाठी महाराजांचा रुस्तुम रक्तात रंगला|
कशी पैदा होतात अशी माणसे सवाल खानास पडला|
कालभैरव बनून जेव्हा मुरारबाजी पुरंदरी लढला |

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर

२६ / १२/२०११

No comments:

Post a Comment