Sunday, 8 January 2012

जेव्हा तो लढला होता

जवळपास सहा महिन्यांपूर्वी टेनिसन ची The Charge of the Light Brigade हि कवीता माझ्या वाचण्यात आली. हि सहाशे इंग्रज सैनिकांवर केलेली कविता , ज्यात जीवाची पर्वा न करता चालून जाणार्या सैनिकांचं वर्णन केल होत. हि कविता वाचल्यापासून माझ्या डोळ्यांपुढे सतत मुरारबाजी सोबत दिलेरखानाशी लढलेले सातशे मराठे येत. पुरंदरला दिलेरखानच्या तावडीतून सोडवायचा निकराचा प्रयत्न करताना मुरारबाजीने पराक्रमाची शर्थ केली. क्षणभर दिलेर खानालाही  वाटून गेल कि असा मर्द आपल्या फौजेत हवा . त्यान मुरार्बाजीना कौल दिला , जहागीरीच आमिष दाखवलं. मुरारबाजीने ते नाकारलं आणि स्वराज्याशी इमान राखल. हा प्रसंग मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

दख्खन वरती चालून आली मिर्झा राजांची स्वारी | सोबतील दिलेरखान अन फौजफाटा होता भारी|
जिंकायचं स्वराज्य, वाढवायचा रुबाब दरबारी| ठाऊक न बिचार्यास कि महाराजांची माणस आहेत न्यारी |

दिलेरखानास बिलकुल निघत नव्हता दम थोडा| सासवडला येताच त्यान दिला पुरंदरास वेढा|
रुद्रमाळ नि पुरंदरावर चालू झाला मारा जोरदार | पण पुरंदरचा किल्लेदार हि होता तेवढाच तालेवार |

हळूहळू खानाने पुरंदरचा वेढा आवळला |तोफांच्या माऱ्यापुढे एक दिवस वज्रगड हि पडला|
जणू कुणी पुरंदरचा खड्गहस्तच तोडला |तोफांचा मारा आता पुरंदरच्या माचीला जाऊन भिडला|

त्यातच एक दिवस सफेद बुरुजावर सुरुंग उडाला | सहज किल्ला जिंकण्याच्या स्वप्नात खान बुडाला|
पण तोफांच्या मार्यानेही मागे हटेनात महाराजांची मानसे|डरली न तोफांना दोन असो कि दोनशे|

तेव्हा दिलेरखानाने ठरवलं रचायचा सुलतानढवा | आता एकाच फटक्यात पुरंदरचा घास घ्यायला हवा|
गोळा केले त्याने पाच हजार कडवे बहलीये पठाण |ज्यांच्या तलवारीला सदैव दुष्मनाच्या रक्ताची तहान |

पाहत होता गडावरून हि तयारी मुरारबाजी|समशेरीचा शेर अन मैदानात रणगाजी|
त्यान ठरवलं आता पलटूया हि बाजी |उधळायचा डाव खानाचा असा निश्चय मनामाजी |

सातशे मराठी मर्दानी उचलली मग ढाल तलवार |भाळी लावला भंडारा बोलत जय मल्हार |
खानाला दाखवण्या निघाले मराठी जोहार |हरहर महादेव गर्जत रणी तळपू लागल मराठी हत्यार|

मुरारबाजीच्या अंगी जणू प्रलयभैरव संचारला|शिवासाठी पुन्हा एकदा वीरभद्र रक्ताने न्हाला|
पाहून पराक्रम त्याचा खानही क्षणभर दिपला|असावा असा रुस्तुम संगती हा मोह त्याला पडला |

ये चाकरीत शहाच्या करू आम्ही तुझी सर्फराजी|घे कौल तू शहाचा ऐक एवढी गोष्ट माझी|
कौल तुझा लखलाभ तुला स्वराज्य हि दौलत माझी | समशेरीने उत्तर देण्या झेपावे मुरारबाजी |

आता मुरारबाजीला लागला एकच ध्यास| घेवून खानच्या नरडीचा घास तोडायचा पुरंदरचा फास|
तितक्यात खानच्या बाणान साधला होता डाव |कंठनाळ छेदत मुरारबाजीच्या वर्मी पडला होता घाव|

शिर कटूनहि मुरारबाजीचा देह रणांगणी झुंजला |
स्वराज्यासाठी महाराजांचा रुस्तुम रक्तात रंगला|
कशी पैदा होतात अशी माणसे सवाल खानास पडला|
कालभैरव बनून जेव्हा मुरारबाजी पुरंदरी लढला |

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर

२६ / १२/२०११

Monday, 12 September 2011

मैत्री

जगण्याच्या वाटेवरती मरणाची भेट घडते।
मरणाच्या दारी तेव्हा जगण्याची किँमत कळते।

जन्माला येणार्याची शेवटी होतेच माती।
पैशाचे ढीग रत्नांच्या राशी न अंती कामी येती।

शेवटच्या प्रवासाकरिता लागती चार खांदे।
त्यासाठी जोडावे जगताना जिवलग मित्र खंदे।

मैत्रीचा हा महिमा आणखी वर्णावा किती।
मित्रांची साथ मिळता न उरे कळिकाळाची भिती।

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१ / ०९  /२०११

Saturday, 18 June 2011

पक्षी पिंजर्यातून उडाला

शहाने हुशारीने रचला होता डाव,  दख्खनी राजाला दावायचा शाही बडेजाव।
तख्तापुढे लवति जिथे खान राणे अन् राव, तिथे कुठे लागावा स्वराज्याचा पडाव।

ज्या नरसिँहाने अफजलखान फाडला ,शास्ताखान बोट छाटुन माघारी धाडला।
 ज्याच्या फौजेने सुरतेत केला कहर, तो शिवा हात जोडत दरबारी होणार हजर।

दरबारी दाखल झाली शिवरायांची स्वारी।शहाने राजांना ठरविले जहागीरदार पंचहजारी।
 ज्यांनी रणात मावळ्यांना दाविली पाठ। शिवरायांपुढे मिरवीती माना करुनी ताठ।

पण आलमगीरास पडला एका गोष्टीचा  विसर । सिंह  कैद झाला तरी कैद होत नाही त्याची जिगर।
आणि त्या दिवशी दरबारात एक नवल घडल । मराठी वाघाच्या डरकाळीने दिल्लीच तख्त हादरल|

नकोत त्या अपमानाच्या खिलती अन् नाहि  पांघरणार लाचारीच्या झुली ।
अपमान पचवत न घालणार मान खाली। ऐकता खडे बोल ती सभा थरारली।

महाराजांभोवती पडला शाही  फौजेचा गराडा, फुलादखानान ठेवला पहारा खडा।
तोडायचा कसा आता हा वेढा।महाराजांच्या जीवलगांपुढे उभा राहिला सवाल बडा|

औरंगशाहाचे डोके जेव्हा  लागले घातपाताचे  डाव लागले रचायला |
राजपुती वचनासाठी  कुंवर रामसिंग उभा राहिला राजांचे प्राण रक्षयाला|

शेवटी सह्याद्रीच्या रानच्या   वाघाला आग्र्याच्या महालांची  हवा नाही मानवली |
महाराष्ट्रसुर्याला नजर कुणाची लागली,दिवसेंदिवस  महाराजांची तब्येत बिघडू  लागली|

वैद्य  आणि हकीमांकडे औषधासाठी मावळ्यांच्या चकरा झाल्या सुरु |
दुवा मिळण्या गरिबांच्या वाटले जाऊ लागले पेठा, पेढे बर्फी अन  लाडू|

एक दिवस वेढ्यातून न तपासताच बाहेर पडला एक मिठाईचा पेटारा |
तपासणार कोण  कशाला ,पहारेकर्यांसाठी झालता नित्याचा मामला सारा|

जेव्हा औषध आणायला  गेलेला कुणीही माघारी नाही आला |
तेव्हा फुलादखानाच्या मनी संशयाचा किडा  जागा झाला |

शोधून पाहिलं आत तर मराठी शेर गायब झालेला |
हजारोंच्या  फौजेचा पिंजरा तोडून पक्षी उडालेला |
धूळ चारत आले होते  आजवर वीर दुष्मनाला |
आज मराठी राजाने होता मिठाईतून डाव साधलेला |



©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१८  / ०६  /२०११ 





Sunday, 22 May 2011

प्रभू चरणी वंदन

सुभद्राकुमारी चौहानांच्या 'ठुकरा दो या प्यार करो' या कवितेचा मी भावानुवाद केला आहे.

देवा तुझे भक्त तुझ्या दारी अनेक प्रकारे येती |
तव सेवेस्तव अनेकरंगी वस्तू आणती |

सजूनिया वाजत गाजत तुझ्या मंदिरी ते येती |
सुवर्णरत्नासम  मूल्यवान वस्तू तुला अर्पिती |

मी एक गरीब काही हि न घेवून आलो |
तरीही साहस करुनी पुजेस उभा राहिलो | 

धूप दीप नैवेद्य नसे अन बहुरंगी आरास नसे |
चरणी  तुझ्या वाहण्यास  फुलांचा हारही नसे |

गुणगानास्तव तुझिया स्वरात माधुर्य नसे |
सांगण्यास भाव मनीचे वाणीचे चातुर्य नसे|

नसे दान अन  नसे दक्षिणा रिकाम्या हातीच आलो|
न ठाऊक पूजाविधी तरीही तुझ्या दर्शनास आलो |

पूजाविधी न ठाऊक मजला ठेवतो मन तुझ्या चरणी |
दान दक्षिणा नसे परंतु भक्ती तुझी असे सतत मनी |

तव प्रेमाचे  तहानलेले हृदय घेवूनीया आलो |
एवढेच आहे मजपाशी तेच अर्पिण्यास आलो |

चरणी तुझ्या अर्पितो मन यापरते काय सांगू |
हे तर तुझीच देणगी  कर याचा स्वीकार प्रभू |


©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
२२ / ०५ /२०११ 
मूळ कविता पुढीलप्रमाणे 
ठुकरा दो या प्यार करो
देव! तुम्हारे कई उपासक कई ढंग से आते हैं
सेवा में बहुमूल्य भेंट वे कई रंग की लाते हैं

धूमधाम से साज-बाज से वे मंदिर में आते हैं
मुक्तामणि बहुमुल्य वस्तुऐं लाकर तुम्हें चढ़ाते हैं

मैं ही हूँ गरीबिनी ऐसी जो कुछ साथ नहीं लायी
फिर भी साहस कर मंदिर में पूजा करने चली आयी

धूप-दीप-नैवेद्य नहीं है झांकी का श्रृंगार नहीं
हाय! गले में पहनाने को फूलों का भी हार नहीं

कैसे करूँ कीर्तन, मेरे स्वर में है माधुर्य नहीं
मन का भाव प्रकट करने को वाणी में चातुर्य नहीं

नहीं दान है, नहीं दक्षिणा खाली हाथ चली आयी
पूजा की विधि नहीं जानती, फिर भी नाथ चली आयी

पूजा और पुजापा प्रभुवर इसी पुजारिन को समझो
दान-दक्षिणा और निछावर इसी भिखारिन को समझो

मैं उनमत्त प्रेम की प्यासी हृदय दिखाने आयी हूँ
जो कुछ है, वह यही पास है, इसे चढ़ाने आयी हूँ

चरणों पर अर्पित है, इसको चाहो तो स्वीकार करो
यह तो वस्तु तुम्हारी ही है ठुकरा दो या प्यार करो

Thursday, 12 May 2011

मैत्र जीवांचे

सुहृदांच्या संगतीने आयुष्याची पाऊलवाट चालावी |
आपुलकीच्या स्पर्शाने अश्रुंचीही फुले व्हावी |

संकटात मित्रांची साथ आनंदात मायेची उब मिळावी |
लहानांकडून आदर वडीलधार्यांकडून कौतुकाची थाप मिळावी |

आनंदाची बरसात अशींच सदैव अखंड चालावी |
आपल्या माणसांच्या सोबतीत जगण्याची मैफल रंगावी |

सुखदुःखाचा हरेक क्षण मित्रांच्या सोबतीत साजरा व्हावा |
हाकेआधीच ओ देणाऱ्या मैत्रीचा  हेवा का न वाटावा |

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
०४/०२/२०११ 


Friday, 8 April 2011

वीरांचा कैसा असे वसंत


कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांच्या 'वीरों का हो कैसा वसन्त' या कवितेचा मी भावानुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे .

येतसे हिमालयातून आव्हान |
 उफाळून येई सागरा उधाण |
क्षितिज असो की नभ अनंत|
पुसति सारे दिग दिगंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

सजली वने लेऊन अनेक रंग |
फुलातुनी दरवळे नव सुगंध|
वसुधेचे पुलकित हर एक अंग|
पण देशमन दिसे सचिंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

भरे कोकीळ तो मधुर तान |
भ्रमर गुंजरावात करिती गान|
निवडा विलास की रण अनंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

हाती मधुघट की क्रुपाण|
यौवनांगा की धनुष्य बाण |
हीच समस्या होत दुरंत  |
वीरांचा कैसा असे वसंत|

आता इतिहासा मौन त्याग|
लंके का तुजला लागे आग|
हे कुरुक्षेत्रा आता जाग जाग|
सांग तुझे अनुभव अनंत|


हळदीघाटाच्या शिळांनो या |
सह्याद्रीच्या दुर्गानो या |
शिव-प्रताप गाथानो या|
जागवा आज त्या स्मृति ज्वलंत|
वीरांचा कैसा असे वसंत|
-
परिमल विश्वास गजेंद्रगडकर 
१०/०१/२०११ 
१०/१/२०११

Saturday, 2 April 2011

काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला

द्रौपदी स्वयंवराकरिता अति अवघड पण रचलेला।वेधेल अचुक लक्ष्याला वरणार याज्ञसेनी त्याला |
सुकुमारी ती सजलेली जणू रती मदनाची अवतरलेली।जशी कुमुदिनी फुले पाण्यात खळी गालावर फुललेली।


भारतवर्षीचे राजे होते त्या सभेत जमलेले।बनविण्या तिज अर्धाँगी काही जण आसुसलेले।
परी बिकट तो मत्स्यवेध ना कुणास जमला | लाविता प्रत्यंचा धनुला दम कित्येकांचा फुलला।


वांझ ठरे का वीर प्रसवा भारतभूमी | की या धरेवर दुष्काळ वीरांचा पडला |
पाहुन दृश्य समोरी द्रुपद ही चिंतीत बनला। जिंकील जो पणात असा का नरसिंह भारती नुरला।


तितक्यात उठे पदरव सामोरा ये नरपुंगव। दानवीर म्हणती ज्याला तो कवचधारी सुर्यकुलोद्भव
सुवर्णासम ज्याची कांती वज्रासम ज्याचे बाहु।कुंडले शोभती  ज्याला तो सव्यसाची अजानुबाहु।


उचलुनी धनुष्य हाती अंगराज शरसंधाना सिध्द होई।तितक्यात कटु स्वर एक कानी कर्णाच्या येई।
भर सभेत गर्जे द्रुपदकन्या वरणार न मी सुतपुत्राला। मृत्तिकेत न शोभे मोती हंसिनी न मिळे कावळ्याला।


सूतपुत्र कि राजकुमार जन्म तर दैवाने मिळतो |कुणा नशिबी फुलांच्या पायघड्या अन कुणा वनवास  मिळतो |

परिस्थितीच्या ऐरणीवर अडचणींचे जो घाव झेलतो  |संकटाच्या मुशीतूनच तर तो खरा  नरवीर जन्मा येतो | 

पुरुषार्थ म्हणती कशाला ना ठावे खुळ्या द्रौपदीला।सुतपुत्र म्हणत जिने अव्हेरले सुर्यपुत्राला |
दुराभिमानापोटी जिने लाथाडिले सौभाग्याला। काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला।


©परिमल विश्वास गजेंद्रगडकर 
०२/०४/२०११ |